‘ प्रबोधिनी ट्रस्ट’ ही कहाणी आहे एका जगावेगळ्या आईची म्हणजेच आदरणीय सौ. रजनी लिमये यांची. आपला मुलगा गौतम मानसिक अपंग आहे हे जेव्हा या बुद्धिमान आईला समजले तेव्हा त्यांच्यातील आई खूप खचली पण डगमगली मात्र नाही. मुलाची काळजी करण्यापेक्षा त्याची काळजी ‘घेण’ त्यांनी पसंत केलं.
एखाद्या विशिष्ट ध्येयाने झपाटलेली ध्येयवेडी माणसंच खूप मोठा इतिहास घडवतात आणि असाच मोठा इतिहास घडवला आहे रजनीताईनी या इतिहासाची पुनरावृत्ती होण अवघडच नाही तर केवळ अशक्य आहे.
आपल्या मानसिक अपंग मुलाच्या भविष्यासाठी ही माता निघाली होती ‘पावलापुरता’ प्रकाश घेऊन अंधारात चाचपडत , ठेचकाळत प्रकाशाच्या शोधात. तिला प्रकाशवाट सापडलीही . त्या प्रकाशाने तिने फक्त आपल्या मुलाचेच नव्हे तर त्याच्यासारख्या असंख्य मुलांची घरे प्रकाशाने उजळून टाकली.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची कवाड खुली करून दिली आणि आधुनिक काळातल्या सावित्रीच्या या लेकीने मानसिक अपंग मुलांच्या विकासासाठी नाशिकमध्ये १९७७ साली प्रबोधिनीचे इवलेसे रोपटे लावून त्यांना शिक्षणाची दारे उघडली केली . मानसिक अपंगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी सजगपणे अथक प्रयत्नाची पराकाष्ठा केली.
स्वत:च्या दु:खाला त्या गोंजारत बसल्या नाहीत तर त्यावर मात करण्याचे प्रयत्न केले . यशस्वीही झाल्या. अनेकांना स्फूर्ती दिली अनेक कुटुंबाना प्रकाशाचा मार्ग दाखवला ह्या उजळलेल्या पणतीने अनेक दिव्यांना आपलेसे करत आपले प्रकाशाचे दान दिले.
रजनीताई म्हणजे सर्वगुणसंपन्न असे व्यक्तिमत्व. एक प्रेरणादायी दीपस्तंभ असे त्यांचे वर्णन करता येईल सकारात्मक विचार हा त्याचां स्वभाव होता समस्येला संधी मानून त्यांनी प्रत्येक संधीचे सोने केले माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती. प्रत्येकाच्या सुखदु:खात त्या सहभागी होत असल्याने संस्थेसाठी असंख्य माणसे जोडली. प्रत्येकातील चांगला गुण ओळखून त्याच्या गुणाचा आपल्या कार्यात उपयोग करून घेतला. आदर्श माता. आदर्श प्रशासक, आदर्श मुख्याध्यापिका, आदर्श शिक्षिका, आदर्श संस्थापिका, आदर्श संस्था सचिव, आदर्श संस्थापिका अध्यक्षा या सगळ्याच भूमिका त्यांनी चोख बजावल्या. इंग्रजी आणि संस्कृत विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. विध्यार्थ्यासाठी पेटी वाजवून त्या सुरेल बालगीत म्हणायच्या’ गोडुली गाणी’ हा त्यांचा कविता संग्रह तसेच ‘जागर ‘ आणि ‘ ध्यानीमनी प्रबोधिनी ‘ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली होती.
त्यांनी ह्या प्रबोधिनीसाठी काय केल नाही ? प्रबोधिनीने शाळांबरोबर बालवाडी सुरु केली. संरक्षित कार्यशाळा उभी राहिली .कल्पक आजोळ सहली आयोजित केल्या. शहीदाना मदत केली ह्या शिवाय दरवर्षी कुसुमाग्रज प्रतिषठानचे न चुकता सुशोभन केले परदेशात जाऊन अशा शाळांचे कार्य कसे चालते हे प्रत्यक्ष पाहिलं आणि तशा सुधारणा येथे केल्या.
त्या कधी कल्पनेच्या राज्यात रमल्या नाहीत. डोक्यात गगनाला भिडणारे विचार असले तरी पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवलेले होते त्यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी होती. विशेष मुलांसाठी विशेष शिक्षक लागतील याचा विचार करून शिक्षक प्रशिक्षण केंद्र चालू केले . मुले मोठी झाली की त्यांची ताकद वाढते. पालक थकलेले असतात . आपल्या पाल्याचे पुढे कसे होणार या विचाराने गांगरून गेलेले असतात. याच विचाराने वसतिगृह चालू झाले. बाहेरगावच्या मुलांची सोय झाली. मुलासाठी आणि मुलींसाठी दोन वेगळ्या सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या. पालक निश्चित झाले. त्यांच्या अतुलनीय कार्याला समाजानेच नव्हे तर शासनानेही दाद दिली. अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
हे आणि यासारखे अनेक पुरस्कार रजनीताईच्या दैदिप्यमान कार्यात त्यांचे पती श्री. नागेश लिमये यांचा शेवटपर्यंत खंबीर पाठींबा लाभला त्यांच्या पाठीब्यामुळेच त्या एवढे मोठे कार्य करू शकल्या. प्रबोधिनीच्या संपूर्ण कार्यात त्यांना त्यांच्या चुलत भगिनी सौ. सुलभा सरवटे यांची फार मोठी मोलाची मदत झाली आहे. मानसिक अपंग मुलांच्या शिक्षणाचा रजनीताईनी घेतलेला वसा गौतमला आदर्श अपंग कामगार हा राज्य पुरस्कार मिळाल्याने पूर्ण झाला.एका विशेष मुलाची विशेष आई ठरलेली ही माउली धन्य धन्य झाली.
अजून काही करायचे राहून गेले आहे असे म्हणता म्हणता अल्पशा आजाराने १६ जानेवारी २०१८ ला त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे देहदान करण्यात आले.