विशेष मुलांचे वात्सल्य मंदिर ‘प्रबोधिनी ट्रस्ट’ – Prabodhini Trust Nashik

विशेष मुलांचे वात्सल्य मंदिर ‘प्रबोधिनी ट्रस्ट’

मानसिक अपंगांच्या विकासासाठी रजनीताई लिमये यांनी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिली शाळा स्थापन केली. 1 जानेवारी 1977 मध्ये स्वत:च्या मुलासह अवघ्या 3 मुलांना घेऊन सुरू झालेल्या शाळेत आज संस्थेच्या सर्व विभागात मिळून 350 हून अधिक मुले शिक्षण घेत आहेत अथवा कार्यशाळेतून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. ‘ध्यानीमनी प्रबोधिनी’ हेच ब्रीद आयुष्याच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत जोपसणार्‍या रजनीताईंचे कार्य काळावर स्वतंत्र ठसा उमटून जाणारे असेच होते. गेल्या 43 वर्षांत संस्थेच्या आज पाच इमारती उभ्या असून विशेष मुलांसाठी हे मायेचे आधार मंदिर ठरले आहे. विशेष मुले येथे केवळ शिक्षणच घेतात असे नाही तर ते अर्थार्जन करुन पालकांना हातभार लावत आहेत. विशेष मुलांचे मानसशास्त्र, त्यांच्या गरजा आणि समस्या यांना डोळ्यांसमोर ठेऊन त्यांच्या विकासासाठी शिक्षणक्रम राबवणे शिक्षणानंतर प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करुन देणे असे सामाजिक बांधिलकीचे कार्य प्रबोधिनी ट्रस्टच्या माध्यमातून गेली चार दशकाहून अधिक काळ अविरत सुरू आहे. त्याचा वेध घेणारा हा लेख….

रजनीताई लिमये यांचा मुलगा मानसिक अपंग आहे हे कळाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला मुंबईत न्यावे आणि तिथे विशेष मुलांसाठी शाळेत दाखल करुन त्याला शिक्षण द्यावे असे ठरवले. त्यासाठी त्या मुंबईत गेल्या. तिथे न्यूरोसर्जन डॉ. गेंडे यांनी रजनीताईंना सांगितले, की तुम्हीही शिक्षिका आहात तेव्हा तुम्हीच नाशिकमध्ये विशेष मुलांसाठी शाळा का सुरू करत नाही? असे म्हणत त्यांनी रजनी लिमये यांना विशेष मुलांसाठी शाळा सुरू करण्याचे सुचवले. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या समस्याग्रस्त मुलांसह इतरही विशेष मुलांना शिक्षण मिळावे, मानसिक अपंग मुले समाजात वावरण्यास योग्य होऊन त्यांच्याही व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, या उद्देशाने विशेष मुलांसाठीचा शिक्षणक्रम पूर्ण करुन प्रबोधनी ट्रस्टची मुहूर्तमेढ रोवली. 1 जानेवारी 1977 रोजी उत्तर महाराष्ट्रातील विशेष मुलांसाठीची पहिली शाळा सुरू झाली. त्या काळी विशेष मुलांना बाहेर काढले जात नसे. त्यांना घरीच ठेवले जात. अशा काळात विशेष मुलांसाठी शाळा चालवणे हे प्रचंड आव्हानात्मक काम होते. त्याकाळी रजनीताईंनी आपली शाळा सांभाळून विशेष मुले असणार्‍यांच्या घरोघरी जाऊन शाळेत आणण्यासाठी जागृती सुरू केली आणि शाळेसाठी विद्यार्थी जमवले. मुलगा गौतम हा शाळेतील पहिला विद्यार्थी ठरला. अवघ्या चार मुलांचा संस्थेत प्रवेश झाला आणि विशेष मुलांसाठी शिक्षणाचा यज्ञ सुरू झाला. तो काळ असा होता की विशेष मुले म्हणजे स्वमग्न, मतीमंद, गतीमंद. मानसिक अपंग यांच्यासाठी शाळा म्हणजे वेड्यांसाठीची शाळा अशाच दृष्टीकोनातून पाहिले जात. मानसिक अपंगत्व म्हणजे याबद्दल अधिक जागृती नव्हती. अशा पार्श्‍वभूमीवर रजनीताईंचा प्रवास सुरू झाला.

विशेष मुलांसाठी पहिली शाळा अशोक स्तंभावरील सर्कल सिनेमागृहाजवळ सुरू झाली. त्यानंतर रजनी लिमये यांच्या काकांनी विशेष मुलांसाठी आपला बंगला शाळेसाठी देऊ केला. नंतर संस्थेचा व्याप वाढत गेला आणि विशेष मुलांसाठी महापालिकेने सध्याच्या पंडित कॉलनी लेन नं.-2 येथे जागा उपलब्ध करुन दिली. मग शाळेसाठी इमारत बांधकाम करण्याचे ठरले. त्यासाठी कर्ज घेऊन शाळेची इमारत उभी राहिली. यासाठी गोविंद स्वरुप यांनी 75 हजारांची देणगी दिली. 1984-85 मध्ये प्रबोधिनीचे काम येथून होऊ लागले.

प्रबोधिनी ट्रस्ट संचलित प्रबोधिनी विद्या मंदिरमध्ये विशेष मुले शिक्षण घेतात. या शाळेत मुलांचे गुण ओळखून त्यांना विविध संधी मिळवून दिल्या जातात. त्यांच्या आयुष्यात निसर्गातून आलेल्या मानसिक अपंगात्वर मात करता यावी आणि जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी विविध स्पर्धा, खेळ, सहली, गायन, वादन, नृत्य, नाटक यांची मदत घेऊन त्यांना शिक्षणही दिले जाते. विशेष मुलांचे शिक्षणही विशेष रित्या तयार केलेले असते. या सर्व उपक्रमामुळे हळुहळू त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होऊ लागतो आणि जीवनाला नवीन अर्थ मिळत जातो. शाळेत मुलांच्या गुणांनुसार विशेष व्यवस्था केली जाते.

मानसोपचार तज्ज्ञांकडून नियमित तपासणी, मार्गदर्शन दिले जाते. लहान वयापासूनच विशेष मुलांच्या वर्तन समस्या ओळखून त्या कमी करण्यासाठी उपचार, मार्गदर्शन केले जाते. यासाठी प्रबोधिनी ट्रस्टमध्ये प्रशिक्षित शिक्षक, कलाशिक्षक, फिजिओथेरपी विभाग, वाहन व्यवस्था, वार्षिक वैद्यकीय तपासणी, पूरक आहार योजना, वाचनालय, मनोरंजनाची साधने, विविध स्पर्धा व शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन, बळ दिले जाते. हस्तव्यवसाय आणि व्यवसाय शिक्षणाची सोय येथे असते. मानसशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मार्गदर्शन, समुपदेशन केले जाते. मुलांची बौद्धिक चाचणी केली जाते.

प्रबोधिनी ट्रस्ट

सन 1977 मध्ये प्रबोधिनी संस्था स्थापन झाली परंतु त्याची ट्रस्ट स्थापना करण्यासाठी तत्कालीन नाशिकचे जिल्हाधिकारी गोविंद स्वरुप यांनी संस्थेला ट्रस्टचे स्वरुप देणे आवश्यक असल्याचे सांगितले. स्वयंसेवी संस्थेची आवश्यक नोंदणी करुन फॉरेन करन्सी निधी स्वीकारण्यासाठी असलेला सोसायटी रजि. नं (एफसीआरए) जो 80 जी अन्वये देणगी दिल्यास आयकर मुक्त असतो तो घेऊन दिला. त्यामुळे संस्थेला फॉरेन करन्सीत निधी देणगीही स्वीकारता येऊ शकणार होती. त्यानंतर कॅनडाहून डॉ. जगन्नाथ वाणी यांनी संस्थेला देणगी देण्याची तयारी दाखवत त्याकाळी 35 लाख रुपयांची मदत केली. त्या काळी 35 लाख म्हणजे प्रचंड मोठ्या रकमेची देणगी होती. चांगल्या कामासाठी कोणीतरी पाठीशी उभे राहतोच हे दानशूर व्यक्ती वेळोवेळी सिद्ध करत होत्या. ही देणगी मिळताच प्रबोधनी ट्रस्टची आयटीआयच्या मागील बाजूस सुनंदा केले विद्या मंदिराची इमारत उभी राहिली. तिथे 6 ते 18 वयोगटातील विशेष मुले शिक्षण घेत आहेत. येथेही प्रबोधिनी विद्यामंदिराप्रमाणेचे सर्व व्यवस्था संस्थेतर्फे केली गेली. याही शाळेला मोठा प्रतिसाद मिळाला.

कार्यशाळा

18 वर्षानंतर विशेष मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण देणे गरजेचे होते. त्यासाठी कार्यशाळा स्थापन करणे आवश्यक होते. हीच गरज ओळखून सुनंदा केले विद्यामंदिर जवळच प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा स्थापन झाली. येथे 18 वर्षांवरील विशेष मुलांना त्यांच्यातील शारीरिक, बौद्धिक, मानसिक क्षमता, योग्यता लक्षात घेऊन विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. कार्यशाळेत विशेष मुले फाईल्स, पेपर डिश, द्रोण, बॉक्स फाईल्स, बूक बाईडिंग, स्क्रिन प्रिंटींग, शुभेच्छा पत्रे तयार करणे, खाद्यपदार्थ, बागकामाची कौशल्य हे आणि असे विविध कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेतात. विविध कंपन्याचे जॉबवर्क मुले तयार करुन देतात. मुलांनी तयार केलेली उत्पादने विकली जातात आणि मुलांना स्वत:च्या पायावर अर्थार्जनाची संधी मिळते. प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन शिकलेली विशेष मुले आज बाहेर जाऊन अर्थार्जन करु लागली आहेत हे नक्कीच कौतुकास्पद आहे. हे सर्व केवळ संस्थेच्या अथक नियोजनबद्ध कार्यामुळे शक्य होत आहे.

प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण केंद्र

सर्वेक्षणानुसार लोकसंख्येतील 3 टक्के व्यक्ती मानसिक अपंग असतात. नाशिक जिल्ह्यात शालेय वयोगटातील मुले साधारणत: 9 हजार आहेत. प्रबोधिनी ट्रस्टसारख्या अनेक संस्थाची विशेष मुलांसाठी आज गरज आहे. अशा संस्थासाठी विशेष प्रशिक्षित शिक्षकांची गरज आहे. त्यासाठी प्रबाधिनी ट्रस्टतर्फे शिक्षण प्रशिक्षण केंद्रही स्थापन करण्यात आले आहेत. येथे आज विशेष मुलांसाठीचे शिकवणारे शिक्षक घडवले जातात.

प्रबोधिनी वसतिगृह

विशेष मुलांचा सांभाळ करून त्यांना वाढविणे व त्यांचे संगोपन करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम असते. काही पालकांना आपल्या विशेष पाल्यांसाठी वसतिगृहाची गरज असते. ही गरज ओळखून नवीन नाशिकमधील सिडको-अंबड लिंक रोडवर प्रबोधिनी वसतिगृहाची स्थापना ट्रस्टतर्फे करण्यात आली. तेथे सध्या 25 मुले आणि 5 मुली आनंदाने राहत आहेत. वसतिगृहाची इमारत अत्यंत स्वच्छ, सुंदर व नेटकी असून, तेथे मुलांच्या खाण्यापिण्याची यथायोग्य काळजी घेतली जाते. मुलांना जेवणासाठी प्रशस्त डायनिंग हॉल, टेबल्स असून, येथील व्यवस्थापक प्रत्येक मुलाकडे जातीने लक्ष देतात. नियमित आरोग्य तपासणी, प्रत्येकाला औषधे वेळेवर दिली जातात. वेळोवेळी सणवार, मुलांचे वाढदिवस साजरे केले जातात. मुलांचे मानसिक, शारीरिक आरोग्य जपण्यासाठी व्यायाम, मनोरंजन आदी दिनक्रम पार पडत असतात. मुलांच्या गरजेनुसार व दर रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केली जाते.
प्रबोधिनी ट्रस्टच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी मोठे कार्य सुरू आहे. मुलांनी तयार केलेली उत्पादने अनेक ठिकाणी विकली जातात. मुले स्वत:च्या पायावर उभी राहण्यासाठी धडपड करीत आहेत. पालकांना हा अत्यंत आश्‍वासक आणि आशेचा किरण प्रबोधिनी ट्र्रस्टने मिळवून दिला.

प्रबोधिनी कार्यकारिणी मंडळ

श्रीमती रोहिणी ढवळे (अध्यक्ष), डॉ. दिलीप भगत (उपाध्यक्ष), अ‍ॅड. गीतांजली हट्टंगडी (उपाध्यक्षा), रमेश वैद्य (सचिव), शलाका पंडित (सहसचिव), पूनम यादव (खजिनदार), डॉ. शिरीष सुळे, अनुराधा जोशी, पल्लवी जयवंत, सुजाता बिल्लाडे व उमा सूर्यनारायणन् (सर्व सदस्य).
मानसिक अपंगासाठी शिक्षणाची दारे खुली झाली. नृत्य नाट्य, संगीत, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात संस्थेची विशेष मुले आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. विशेष म्हणजे अशी विशेष 40 मुले विविध कंपन्यांत सामान्यांप्रमाणे नोकरी करीत आहेत. उमा सूर्यनारायण यांनी शाळेचे ऋण म्हणून ‘फॉर्च्युनर’ कंपनीत नोकरीची दारे उघडी करून दिली. अशा मुलांसाठी प्रत्येक घरी जाऊन या मुलांना घरातून घेऊन जातात आणि कामानंतर मुले आणून सोडली जातात. सुला वाईन कंपनीसाठीही अनेक वर्क ऑर्डर प्रबोधिनीची मुले व्यवस्थितपणे पूर्ण करत आहेत.

रजनीताई लिमये यांच्या नंतर संस्थेचे काय?

रजनी लिमये यांच्यानंतर संस्थेचे काय होणार असा प्रश्‍न अनेकांना पडला होता. मात्र त्यांच्यानंतरही संस्थेचे कार्य अत्यंत सुरेखपणे सुरू आहे. विद्यमान अध्यक्षा रोहिणी ढवळे आणि संपूर्ण कार्यकारिणी अतिशय सुनियोजितपणे कामे करत आहेत. कोरोना काळात, लॉकडाऊनमध्येही संस्थेने उत्तम कार्य केले.

हृदयस्पर्शी….

लिमये ताईंनी प्रत्येक मुलांना प्रेम दिले; मात्र त्या सोडून गेल्यानंतर त्यांच्या मुलाला हे कळले नाही, की आई जग सोडून गेली. आई फुलात झोपली आहे असे तो त्यावेळी म्हणाला होता. लिमये ताई नेहमी म्हणायच्या, की मी हे जग सोडून जाईन, त्यावेळी माझ्या गौतमला आई गेली हे कळणार नाही आणि असेच झाले होते. लिमये ताईंच्या निधनानंतर असाच ह्रदयंस्पर्शी प्रसंग आपण पाहिल्याचे रोेहणी ढवळे सांगतात.

लहानपण देगा देवा…

सन 2012 मध्ये संस्थेच्या मुलांनी ‘लहानपण देगा देवा’ नाटक सादर केले. मुंबईला झालेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत या नाटकाने रसिकांची मने तर जिंकलीच, शिवाय अंतिम फेरीत या नाटकाने सर्वोत्कृष्ट दिव्यांग नाट्यनिर्मितीचा पुरस्कार मिळविला. त्यावेळी जितक्या स्पर्धा झाल्या, त्यात बक्षिसांची रक्कम 70 हजार रुपये होती. कुठल्याही स्पर्धेत प्रबोधिनीच्या मुलांनी बक्षिसे घेतली नाहीत, असे झाले नाही हे विशेष. त्यावेळी नाटक काय असते हे या मुलांकडून शिका, असे परीक्षकांनी उपस्थितांना सांगितले होते.

संस्थेचे आवाहन

विशेष मुलांना वाढविणे व त्यांचे पालनपोषण करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम असते. त्यासाठी संस्था नेटाने काम करते; मात्र तरीही प्रत्येक कामासाठी समाजाच्या आर्थिक मदतीची गरज असतेच. त्यासाठी दानशूर व्यक्ती, विदेशातील भारतीय एनआरआय यांच्यासह नाशिककरांचे हे कर्तव्य आहे, की विशेष मुलांसाठी यथाशक्ती योगदान देणे. संस्थेत दाखल झालेल्या गरीब घरातील विशेष मुलांसाठी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन मदत केली जाते. पूरक आहार योजना आणि प्रत्येक मुलांचा वाढदिवस साजरा करणे यामुळे मुले आनंदी राहतात. ती प्रेमाची भुकेलेली मुले असतात. संस्थेतील मुलांसाठी मदत करण्याची गरज आज आहे. त्यासाठी विविध योजनांच्या मदतीतून सुजाण नागरिक मदत करू शकतात. संस्थेचे उपक्रम विनाखंड व अव्याहत सुरू राहण्यासाठी अर्थिक सहाय्य लागतेच. त्यासाठी खालील पद्धतीने मदत केली जाऊ शकते. संस्थेच्या मुलांसाठी अत्यावश्यक वस्तू, शिधा देणे, गरीब मुलांचे एका वर्षासाठी पालकत्व स्वीकारणे त्यासाठी फक्त वर्षाला 6 हजार रुपये खर्च येतो. पूरक आहार योजनेसाठी 5 हजार रुपये किंवा इच्छेनुसार दिले जाऊ शकतात. वाहतूक व्यवस्थेसाठी 700 ते 900 रुपये दरमहा दिले जाऊ शकतात. सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ व सहली यासाठी यथाशक्ती आर्थिक मदत केली जाऊ शकते. मुलांनी तयार केलेल्या वस्तू विकत घेऊनही मदत केली जाऊ शकते. ट्रस्टमध्ये कार्यशाळेत तयार होणार्‍या कागदी पिशव्यांसाठी वृतपत्रे, मासिके व नियतकालिके यांची रद्दी देणगी देऊनही संस्थेला सहकार्य केले जाऊ शकते.

निल कुलकर्णी – नाशिक