स्व.कै.सौ. रजनीताई लिमये यांचे हे काव्य त्यांनी ह्या निरागस मुलांमध्ये विठोबा शोधला. १९७७ साली त्यांनी प्रबोधिनी ट्रस्टची स्थापना केली. ज्या काळात ह्या मुलांना वेडा समजल किंवा हिणवल जायचं त्या काळात त्यांनी घरोघरी फिरून गोळा केलेल्या ४ मुलांना घेऊन एका लहानशा खोलीत शाळा सुरु केली. आज या शाळेत ३६० विद्यार्थी ४ सुसज्ज इमारतीमधून विशेष शिक्षणाचा लाभ घेत आहेत. शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसन ह्या त्रिसूत्रीच्या विचारांने प्रेरित होऊन बाईनी या खडतर तपस्येला सुरुवात केली. आज त्याचे फलित म्हणून ह्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. बाईनी लावलेल्या एका छोट्याशा रोपटयाचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. त्याच्या सावलीत आज हे विद्यार्थी आनंदाने विसावले आहेत.
सौ. रजनी लिमये या प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा. अत्यंत बुद्धीमान असलेल्या रजनीताई म्हणजे अत्यंत सोज्वळ असं व्यक्तिमत्व. शिक्षणात कायमच अग्रस्थानी असलेल्या रजनीताईना जेव्हा त्यांचा मुलगा मानसिक अपंग आहे असे कळले तेव्हा त्या खूप खचून गेल्या. जमतील ते सर्व उपाय करून झाले. पण एव्हाना सामान्य शाळांची दारे त्यांच्या मुलासाठी म्हणजेच गौतमसाठी बंद झाली होती पण स्वत: शिक्षिका असलेल्या रजनीताईना आपला मुलगा निरक्षर असावा हे कधीच मान्य होणे शक्य नवते.
आपल्याला मुंबईत नोकरी मिळाली तर त्याला मुंबईच्या शाळेत घालता येईल या विचाराने त्या मुंबईला गेल्या तेथे न्यूरोसर्जन डॉ. गिंडे यांना दाखवले. त्यांनी असे सांगितले की गौतमच्या बुद्धीची वाढ होत नाहीये. मानसिक अपंग आहे तो त्यासाठी स्वतंत्र शाळाच पाहिजे त्याच्याकडून खूप अपेक्षा करू नक. तुम्ही स्वत: शिक्षिका आहात. नाशिकला यांच्यासारखी बरीच मुले असतील ती शोधा आणि कामाला लागा.
‘I am bigger than you’ असे दैवाला सांगून त्या पदर बांधून उभ्या राहिल्या मानसिक अपंग मुलांची शाळा काढण्याचा निश्चय करून समदु:खी पालकांचा शोध सुरु केला. सुरवातीला त्यांना अत्यल्प आणि नकारात्मक प्रतिसाद मिळाला. पण त्या डगमगल्या नाहीत. जिद्दीने ४ मुले गोळा करून एका लहान खोलीत शाळा सुरु झाली. हळूहळू शाळेचा पसारा वाढायला लागला. होती ती जागा पुरेना. मोठ्या जागेत शाळा स्थलांतारीत झाली. मुलांची संख्या वाढायला लागली आणि मग प्रबोधिनी विद्यामंदिर ही शाळा सुरु झाली. शाळेला पैशाची कमतरता जाणवायला लागली. ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांना करसवलत मिळते म्हणून मग ‘ प्रबोधिनी ट्रस्ट’ या संस्थेची स्थापना झाली. प्रबोधिनी ट्रस्टचा कारभार विस्तारू लागला. देणग्या मिळायला सुरुवात झाली. प्रगतीचा मार्ग सोपा झाला. आज प्रबोधिनी ट्रस्टच्या ५ सुसज्ज इमारती आहेत. प्रबोधिनी ट्रस्टच्या शाखा पुढीलप्रमाणे :
प्रबोधिनी विद्यामंदिरला सरकारी अनुदान मिळते त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही यांचे पगार चांगले आहेत. पण श्रीमती सुनंदा केले विद्यामंदिरला मात्र आजपर्यंत अनुदान प्राप्त झालेले नाही. सुनंदा केले शाळेत १०० विद्यार्थी विशेष शिक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे त्यासाठी लागणारे शिक्षक , मदतनीसव इतर कर्मचा-यांच्या मानधनावर ट्रस्टचा बराच खर्च होतो. इमारती झाल्या पण आता देखभाल खर्च दिवसेदिवस वाढतो आहे. त्यामुळे ट्रस्टला देणग्या मिळवाव्यालागतात. विद्यार्थी वाहतुकीसाठी ६ बसेस आहेत. बसशिवाय विशेष मुले शाळेत स्वतंत्रपणे येऊ शकत नाहीत. शाळा चालवायची असेल तर बस चालवणे अपरिहार्य आहे. ह्या विध्यार्थ्याकडून नाममात्र विकास निधी [ इमारत फंड] आकारले जाते. पण निम्मयापेक्षा जास्त पालक तेही भरू शकत नाही. बस फी पण काही ठराविकच पालक भरतात. त्यामुळे डिझेल खर्च आणि बसचा देखभाल खर्चही संस्थेलाच करावा लागतो संस्थेच्या सहा बसेस आहेत.
उल्लेखनीय
Ministry of Social Justice and Reform तर्फे पायलट प्रोजेक्ट करण्यासाठी भारतातील काही संस्थाची निवड केली होती त्यात प्रबोधिनीचा समावेश होता. अपंग मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम होता. सन २००४ मध्ये उत्कृष्ट संस्था म्हणून प्रबोधिनीला गौरवपत्र मिळाले. आमच्या विशेष मुलांची समस्या लोकांच्या लक्षात यावी म्हणून Run of Recognition असे नाव ठरले आणि अभूतपूर्व उत्साहात ही दौड पार पडली.
१ जानेवारी २००० संस्थेचा २३ वा वाढदिवस, पालक शिक्षक विद्यार्थी यांनी ज्योतीने ज्योत लावून २००० मेणबत्त्या तेवविल्या गेल्या. रद्दी दान योजना यशस्वीरित्या चालली आहे. जनजागृती ही प्रथा १९९२ पासून आजतागायत सुरु आहे.